धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील परळी पंचायत समितीच्या कामाचा राज्यपालांकडून गौरव!
परळी दि. २०……. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, परळीचे आमदार माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील परळी पंचायत समितीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील परळी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता त्यानंतर आता पंचायत समितीला राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यासाठी परळी पंचायत समितीने धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या योजनेअंतर्गत परळी तालुक्यातील प्रपत्र ब मधील सिरसाळा येथील 72 लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत जागा खरेदी करून देऊन घरे बांधून देण्यात आली आहेत. यानिमित्त आज परळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संजय केंद्रे व शिष्टमंडळाचा गौरव करून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महामहिम राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते व मुख्य सचिव अजोय मेहता, श्रीमती शर्मा मॅडम, धनंजय माळी, यांसह परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, विस्ताराधिकारी केषोड, यांच्यासह आदी उपस्थित होते.
परळी मतदारसंघाचे आमदार तथा माजी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा पुरस्कार परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे म्हणत पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
माजी मंत्र्यांनी श्रेयासाठी निरर्थक उठाठेव करू नये – सौ. कल्पना सोळंके, पिंटू मुंडे
दरम्यान गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून परळी पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून श्री. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कारभार चालतो. 12 पैकी 8 सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. तरीही एक पत्रक काढून या पुरस्काराचे श्रेय माजी पालकमंत्री घ्यायची उठाठेव का करत आहेत असा प्रश्न पंचायत समिती सभापती सौ. कल्पनाताई सोळंके यांनी उपस्थित केला आहे.
पंचायत समितीच्या सदस्यांनी योजना व निधी साठी केलेल्या कामाला अनेकवेळा माजी मंत्र्यांनी अडथळे आणले होते हे सर्वश्रुत असून कदाचित त्याच काही कारणांनी त्यांचा गत विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला असावा, त्यामुळे आमच्या कामाचे श्रेय लाटण्याची उठाठेव करण्याऐवजी त्यांनी प्रत्यक्ष लोकामध्ये जाऊन कामे करावीत असा खोचक सल्ला उपसभापती पिंटू मुंडे यांनी दिला आहे.