News

“मी धनंजय पंडितराव मुंडे…” आवाज येताच परळी, बीड सह राज्यभरात जल्लोष!

मुंबई (प्रतिनिधी) दि. ३० : महाविकास आघाडीच्या महाविस्तारातील शपथविधी आज पार पडला. परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर परळी, बीड सह राज्यात मुंडेंच्या समर्थकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
आज (दि. ३०) महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, यामध्ये श्री. अजितदादा पवार,  श्री.अशोकराव चव्हाण, दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर चार क्रमांकावर धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.
 जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून मुंडेंचा २४ वर्षाचा राजकीय प्रवेश अनेक कारणांनी चर्चेत राहिलेला आहे.
आज मुंडेंनी “मी धनंजय पंडितराव मुंडे….” अशी शपथ ग्रहण करायला सुरुवात करताच त्यांचा मतदारसंघ असलेल्या परळी येथे अनेक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व जयघोष करून आनंद साजरा केला. बीड मध्येही व संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी भवन समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
मुंबई येथे शपथविधी साठी मुंडेंचे हजारो कार्यकर्ते जमले होते, परंतु शपथविधी समारंभासाठी मर्यादित प्रवेशिका असल्याने अनेकांनी टीव्ही स्क्रिनवरच शपथविधीला साक्ष दिली. मुंडे यांच्या ब ४ या शासकीय निवासस्थानी मोठी स्क्रिन लावून समारंभ पाहण्याची सोय करण्यात आली होती. अनेकांनी ही स्वप्नपूर्ती असून मुंडे यांच्या अविरत संघर्ष व कर्तृत्वाचे हे चीज असल्याचे सांगत हा क्षण आपल्यासाठी दिवाळी आहे अशा भावना व्यक्त केल्या.
चौकट
 
शपथविधीला जाण्यापूर्वी…
दरम्यान शपथविधीला जाण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी दिवंगत नेते तथा चुलते स्व. गोपीनाथराव मुंडे, वडील स्व.  पंडितराव मुंडे यांच्या प्रतिमांना वंदन करून अभिवादन केले, भगवानबाबा यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. त्याचबरोबर आईचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतले. धनंजय मुंडे हे शपथविधी पूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब  यांच्याही भेटीला गेले होते, तेथे पवारांसह त्यांनी सौ. प्रतिभाताई पवार यांचेही आश्रिवाद घेतले.
 
हे तर जनतेचे प्रेम
हे मंत्रिपद म्हणजे मतदारसंघातील जनतेचे प्रेम व खा. पवार साहेब यांचे आशीर्वाद असून पक्ष देईल त्या पदाचा भार आपण स्वीकारून  पदाला व महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू अशा भावना मुंडेंनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *