ना पीए ना स्टाफ, तरीही धनंजय मुंडेंचे वर्क फ्रॉम होम जोरात!
लॉकडाऊनमध्ये लढवत आहेत एकटेच कामाचा किल्ला
परळी (दि. २७) —- : कोणताही मोठा राजकीय नेता, मंत्री, खासदार किंवा आमदार म्हटलं की पीए, स्टाफ, कार्यकर्ते असा मोठा लवाजमा कामकाजात दिसून येतो. त्यात धनंजय मुंडे यांच्यासारखा मासलिडर असेल तर ही गर्दी आणि स्टाफ ही दुप्पट होतो, कोरोना मुळे मात्र धनंजय मुंडे यांच्या भोवती वेगळेच चित्र दिसत आहे.
मात्र सध्या लॉकडाऊन मुळे त्यांनी आपल्या सर्व स्टाफला ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या आहेत. स्टाफ नसला तरी धनंजय मुंडे हे एकटेच वर्क फ्रॉम होमचा धडाका लाऊन किल्ला लढवत आहेत.
ना. मुंडेंनी वर्क फ्रॉम होम सुरू ठेवले असून सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजासह दिवसभरात ते अनेकदा बीड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्ह्यातील अन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोरोनाच्या संदर्भातील आढावा घेत असतात व विविध सूचना देत असतात.
सकाळी प्राणायाम करणे, वर्तमानपत्र उपलब्ध नसल्याने मोबाईल वरूनच विविध वर्तमानपत्रांच्या डिजिटल प्रती वाचणे त्याचबरोर फोनवरून राज्यातील विविध घडामोडींचा आढावा घेणे असा त्यांचा दिनक्रम आहे.
आर्थिक वर्ष अंतिम टप्प्यात असल्याने सामाजिक न्याय विभागातील विविध प्रलंबित कामांच्या बाबतीतही मुंडेंनी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोना संदर्भातील उपाययोजना, तसेच राज्यभरातील ऊसतोड कामगारांची जेवण व निवासाची व्यवस्था, बीड जिल्ह्यातील ७१८८ घरकुलांना मंजुरी, राज्यातील सर्व दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व अन्य सुविधा असे अनेक महत्वपूर्ण निर्णय या काळात धनंजय मुंडे यांनी घेतले आहेत.
परळी मतदारसंघ व बीड जिल्ह्यातील अनेक लोक फोन व अन्य माध्यमातून आपण लॉकडाऊन मुळे अडकल्याच्या किंवा तत्सम अन्य तक्रारी श्री. मुंडेंना कळवतात. तेव्हा कोणताही पीए किंवा अन्य कर्मचारी मदतीला नसताना देखील ना. मुंडे ते विषय जिथल्या तिथे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात.
मतदारसंघ व जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्याही ते सतत संपर्कात असून लागेल त्याला लागेल त्या प्रकारची मदत करण्यासहित सातत्याने विविध सूचना करत आहेत.
गेल्या दोन दिवसात त्यांच्या ‘नाथ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत ५००० पेक्ष्या अधिक हातावर पोट असलेल्या गरजूंना २१ दिवस पुरेल इतका किराणा मोफत वाटप करण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांचे ऑनलाईन ऑफिस
धनंजय मुंडे यांचे कार्यालय जरी बंद असले तरी ते स्वतः व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांनी फोन, व्हाट्सअप्प यासह विविध माध्यमातून अविरत ऑनलाईन कार्य सुरू ठेवले असून कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वजण एकजुटीने लढत असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
डॉक्टरांसोबत केली चर्चा
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परळीतील डॉक्टर प्रतिनिधींसोबत आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चर्चा केली. या लॉकडाऊनच्या काळात #OneRoofHospital ही संकल्पना सुरु करता येईल का या संदर्भात चर्चा केली. तसेच सर्व डॉक्टर्सच्या समस्या जाणून घेत त्यांना लागणारे #PEP किट यासह अनेक वैद्यकीय साहित्याविषयी माहिती घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी , डॉक्टर सूर्यकांत मुंडे, डॉक्टर मधुसूदन काळे, डॉक्टर अजित केंद्रे, डॉक्टर संतोष मुंडे, डॉक्टर अजय मुंडे, डॉक्टर विजय रांदड आदी उपस्थित होते