News

जनतेनेच खेचून आणली धनंजय मुंडेंची विजय’श्री’

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात जनतेने धनंजय मुंडेंना 121186 मते देऊन भरघोस मतांनी विजयी केले. आदरणीय शरद पवारांसहीत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडेंवर विश्वास टाकला तो त्यांनी जनतेचे आशीर्वाद मिळवून सार्थ ठरवला. हा विजय विनम्रपणे स्वीकारत “सत्यमेव जयते” म्हणत जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जीवाचे रान करेल अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी विजयानंतर दिली. सोबतच घरातील एक व्यक्ती पराभूत झाल्याचे दुःखही आहे असे ते म्हणाले.
ही निवडणूक पहिल्या दिवशीप्रमाणे संपूर्णपणे जनतेने हातात घेतली होती. माजी मंत्री पंडितराव दौंड यांच्यासह संपूर्ण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत जनतेचा विश्वास संपादन केला. आपल्या संपूर्ण प्रचारात धनंजय मुंडे फक्त जनतेच्या मनातील मुद्दे हाती घेत लढले. समोरून सातत्याने प्रखर हल्ले झाले. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या घरासमोर जाहीर सभा घेतली. इतकेच काय गृहमंत्री अमित शहांसह अख्खे भाजप धनंजय मुंडेंच्या विरोधात उतरले कधी प्रखर भावनिक हल्ले केले गेले तर कधी खालच्या पातळीवर जाऊन नाहक बदनाम केले गेले. हे सारे काही जनता जनार्दन शांतपणे पहात होते अखेर जनतेने सत्यालाचं साथ देत धनंजय मुंडेंनाचं विजयी केले.
गेल्या चोवीस वर्षांपासून धनंजय मुंडे राजकारणात सक्रिय आहेत. प्रसंगी त्यांच्यावर अन्याय झाला पण स्थितप्रज्ञपणे त्यांनी तो पचवत सातत्याने जनतेचे कामं ते मनापासून करत राहिले. जनतेने कठोर अग्निपरीक्षेनंतर त्यांच्या पदरात विजयाचे दान टाकत भाळी गुलाल लावला. एक्सिट पोलदेखील सुरुवातीपासून त्यांच्या विरोधात दाखवण्यात आले, पण त्यांनी आपले संतुलन कधीच ढळू न देता ते आणि त्यांचे कार्यकर्ते एकाग्रतेने काम करत राहिले आणि त्याचीच परिणीती म्हणजे त्यांचा आजचा दणदणीत विजय.
सन २०१४ च्या निवडणुकीनंतर धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली परळी नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणून गेले पाच वर्षे ते जनतेच्या बाजूने कायमच सरकारवर तुटून पडले. सोबतच राज्यासह परळी मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसोबत आपली नाळ घट्ट करत धनंजय मुंडेंनी मागच्यावेळेपेक्षा तब्बल पन्नास हजार अधिकचे मते मिळवत विजयाला गवसणी घातली आहे.
भर पावसात रॅली
या विजयाचा जल्लोष केवळ कार्यकर्त्यांनीच नाही तर संपूर्ण परळीकरांनी आज साजरा केला.  दोन दिवसांवर दिवाळी असली तरी आज शहरात दिवाळीचे वातावरण दिसून आले . संपूर्ण शहर फटाक्यांची आतिषबाजी गुलालाने , माखलेले रस्ते आणि घोषणांचा निनाद , एकमेकांना आनंदाने मिठी मारणारे कार्यकर्ते , पेढे वाटून साजरा केला जाणारा आनंद, पुष्पहार यांचा वर्षाव असे चित्र आज असल्याने संपूर्ण शहरच आज विजय साजरा करत आहे असे चित्र निर्माण झाले.
रात्री उशिरा पर्यंत भर पावसात गुलालाच्या उधळणीत सर्वसामान्य जनता जनार्दन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
असा आहे धनंजय मुंडेंचा आजचा दिनक्रम ◆आज सकाळी सर्वात पहिले घेतले आईचे आशीर्वाद
◆ स्व. पंडितअण्णांच्या प्रतिमेसमोर झाले नतमस्तक
◆ ग्राम दैवत प्रभू वैद्यनाथासह देव देवतांचे घेतले दर्शन
◆ त्यांनंतर मतमोजणी केंद्राकडे रवाना
◆ गुलाल आणि भरपाऊसात विजयी रॅली
◆ सातत्याने साधत आहेत जनतेशी आणि प्रसारमाध्यमांशी सुसंवाद
कार्यकर्त्यांना आनंदाश्रू
धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी मागील काही दिवस अहोरात्र झटणारा कार्यकर्ता मागील 4 दिवसात त्यांच्यावर झालेले भावनिक हल्ले, प्रसिद्धी माध्यमातून जाणीवपुर्वक पेरल्या गेलेल्या पराभवाच्या बातम्या यामुळे अस्वस्थ झाले होते. मात्र आज चांगले यश मिळताच अनेकांना आनंदाश्रू आले, साहेबांच्या गळ्याला पडत त्यांनी त्याला मोकळी वाट करून दिली.
सुरुवातीपासूनच आघाडी
धनंजय मुंडे यांनी मतमोजणी च्या पहिल्या फेरीपासून आपली विजयी आघाडी वाढवत नेत शेवटी 32000 मतांनी असा दिमाखदार विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *