News

मंत्री होऊन भगवानबाबांच्या दर्शनाला या; महंत नामदेवशास्त्रींनी दिलं धनंजय मुंडेंना निमंत्रण!

मुंबई दि. १३…. धनंजय आपण मंत्री होऊन भगवान गडावर ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घ्यायला या, असं निमंत्रण भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी स्वतः धनंजय मुंडे यांची भेट घेऊन दिले आहे. याबाबत स्वतः आ. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
सबंध मराठवाड्याचे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवान गडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबा यांच्या वास्तव्याने पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे. याचठिकानी काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना राजकीय हेव्यादेव्यांमुळे येण्यास मज्जाव करण्यात आला होता. परंतु आज स्वतः महंत नामदेव शास्त्री यांनीच श्री. मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद दिले. श्री. मुंडे यांनी ‘संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ असे म्हणत महंत नामदेव शास्त्रीन्नी आपल्याला गडावर दर्शनाला येण्याची ‘आज्ञा’ केल्याचे म्हटले आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडावर स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात महंत नामदेव शास्त्री यांनी राजकीय भाषणास बंदी घातल्याने गडावरून राजकीय वादंगाचे काहूर माजले होते. आ. धनंजय मुंडे हे धार्मिक सुसंस्कृतपणा जपण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे आज नामदेव शास्त्री यांनी स्वतः श्री मुंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन परळीतील विजयासाठी त्यांचा गौरव करत आशीर्वाद दिले तथा मुंडेंना भगवानगडावर येऊन संत भागवनबाबांचे आशीर्वाद घेण्याचे निमंत्रण दिले, यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *